Samir Lande 06 Oct 2025 कहानियाँ प्यार-महोब्बत Samir Lande ताम्रा – रक्ताच्या गंधात विरलेलं प्रेम 15156 0 Marathi :: मराठी
रात्र, ओल्या मातीचा गंध आणि हलकं थरथरणारं धुकं. मी या वाड्याबद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा, फक्त एक कथा वाटली होती. पण आता... या कागदांवर जे लिहितो आहे ते फक्त शब्द नाहीत, ते माझं श्वास आहेत. गावाच्या टोकाला असलेला जुना वाडा आजही उभा आहे भिंतींवर शेवाळ, खिडक्यांत अंधार, आणि कोपऱ्यांत काहीतरी अनामिक कुजबुज दडलेली. गावकरी अजूनही तिकडे जात नाहीत. ते म्हणतात त्या वाड्यात ती अजूनही आहे. ताम्रा. ती कोण होती, हे कुणालाच ठाऊक नाही. फक्त एवढं माहित आहे की, ज्या रात्री रक्ताचा वास वाऱ्यावर दरवळतो, त्या रात्री कोणीतरी वाड्याच्या खिडकीत दिसतं — धूसर आकृती, ओठांवर लाल छटा, आणि डोळ्यांत विरलेलं प्रेम. मीही एक रात्री तिकडे गेलो. वारा थंड होता, पण आतमध्ये हवा वेगळीच जड, जणू कुणाचं गुपित श्वासात मिसळलेलं. भिंतींवर हात ठेवला तेव्हा ओलसर थेंब बोटांवर आले. ते पाणी नव्हतं... काहीतरी गोडसर. खोलीच्या कोपऱ्यात एक मेणबत्ती पेटलेली होती. ती हालणाऱ्या ज्योतीसारखी नव्हती, तर जणू कुणाच्या डोळ्यांचा प्रकाश वाटत होती. मी वही उघडली, आणि लिहायला सुरुवात केली रक्ताच्या गंधात एक प्रेम जिवंत आहे. शब्द लिहिताच काहीतरी जाणवलं जणू कुणीतरी माझ्या मागे उभं आहे. थंड श्वास गळ्याजवळून गेला. मी वळलो पण कुणीच नव्हतं. फक्त धुकं... आणि त्यात तिची आकृती. ती धूसर होती, पण डोळ्यांत जिवंतपणा. ती पुढे आली, आणि म्हणाली तू माझं लिहितो आहेस. माझ्या हातातलं पेन थरथरलं. ती माझ्या भोवती फिरली, हवेत तिचा सुगंध पसरला ओल्या माती, चंदन, आणि रक्ताचा वास. ती कुजबुजली मला लिही... जोवर तू लिहितोस, तोवर मी जिवंत आहे. त्या रात्रीनंतर प्रत्येक पानावर तिचं अस्तित्व उमटत गेलं. कधी तिचं हास्य, कधी तिचे ओठ, कधी तिचा थंड स्पर्श. मी जितकं लिहितो, तितकं माझं रक्त सुकत जातंय असं वाटायचं. पण थांबू शकलो नाही. ती जणू माझ्या शब्दांमधून बाहेर पडत होती. एका रात्री तिचा आवाज ऐकला प्रेमाची किंमत मोजायची असते. तुझं हृदय तयार आहे का? मी हसलो. मी आधीच रिकामा झालो आहे, असं उत्तर दिलं. त्या क्षणी तिचा हात माझ्या छातीवर होता. थंड, पण नशेसारखा. हृदयाच्या ठोक्यांत तिचं नाव ऐकू येत होतं , ताम्रा. काही दिवसांनी मला जाणवलं मी आता लिहित नाही, ती लिहिते. पेन माझ्या बोटांत आहे, पण नियंत्रण तिचं. अक्षरं माझ्या रक्तात तयार होतात, आणि पान लालसर होतं. शब्दांवर ओलसर ठिपके दिसतात. एका दिवशी ती म्हणाली मी तुझ्यात आहे आता. तू संपलास की मी मुक्त होईन. मी तिला विचारलं मुक्ती म्हणजे काय? ती हसली जेव्हा प्रेमाला शरीर मिळतं. त्या रात्री मी शेवटचं पान लिहिलं. प्रेमाच्या सुगंधात मी विरतो आहे. पुढचं आठवत नाही. फक्त एवढं कळतं मी या वहीत अडकलो आहे. ज्यानेही ती उघडली, त्याच्या बोटांवर तोच लाल ठसा उमटतो. रक्ताचा नाही ताम्राचा. आजही, जेव्हा मी हे शब्द वाचतो, तेव्हा तिचा श्वास जवळ येतो. ती म्हणते तू मला पुन्हा लिहिलंस... म्हणजे मी अजून जिवंत आहे. खिडकीबाहेर धुकं आहे. पण त्या धुक्यात दोन डोळे चमकतायत. मी पेन खाली ठेवतो. शब्द थांबतात. श्वासही. पण हवेत अजूनही तोच वास.. रक्ताचा, आणि प्रेमाचा. लेखक : समीर लांडे , एक हळव्या मनाचा प्रवाशी